12 मेपासून रेल्वे गाड्या पुन्हा धावणार, लवकरच करता येईल रिझर्वेशन

0

12 मेपासून रेल्वे गाड्या पुन्हा धावणार, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाउदरम्यान भारतीय रेल्वेने 12 मेपासून पुन्हा प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सुरुवातीला 15 रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या केवळ 15 जोड्याच (30फेऱ्या) धावणार आहेत. अशी माहिती रेल्वे विभागाने रविवारी एका निवेदनाद्वारे दिली. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू असून, ते 17 मेपर्यंत असेल.

एएनआय या वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटनुसार भारतीय रेल्वे 12 मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा विचार करीत आहे. यानुसार टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक पातळीवर 30 रिटर्न ट्रेन सुरू होतील. त्यासाठी रेल्वे गाड्या रेल्वे मंत्रालयाने एक सविस्तर योजना तयार केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्रालयाने म्हटले आहे, की या सर्व रेल्वे गाड्या विशेष रेल्वे गाड्या म्हणून, नवी दिल्ली येथून दिब्रूगड, अगरतळ, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई  सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावीदरम्यान धावतील.

या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांना मोठी मदत मिळू शकते. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल.

रेल्वे स्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांसाठी स्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर्सवरून तिकीट मिळणार नाही. तसेच, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट आहेत, त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.

या शिवाय रेल्वे आणखी काही मार्गांवरही विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मात्र, हे उपलब्ध कोचेसवर अवलंबून आहे. कारण 20,000 कोचेस, कोरोना केअर सेंटर म्हणून रिझर्व आहेत. तर ‘श्रमिक स्पेशल’च्या रुपात रोज 300 रेल्वे गाड्या चालवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर कोचेस रिझर्व आहेत, असेही रेल्वे विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तिकीट बुक कसं करणार?

या प्रवासी रेल्वे गाड्यांसाठी 11 मे रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून तिकीट बुकिंग करता येणार आहे. रेल्वे विभागाची अधिकृत वेबासाईट https://www.irctc.co.in/ वर कुणालाही तिकीट बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या काऊंटर होणारी गर्दी लक्षात घेते देशभरातील रेल्वे काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. अगदी प्लॅटफॉर्म तिकिट देखील ऑनलाईनच घ्यावं लागणार आहे. त्यासाठीही रेल्वे स्टेशनवर व्यवस्था नसेल.

ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असणार आहे त्यांनाच रेल्वे स्टेशनवर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांना चेहऱ्याचा मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच रेल्वे प्रवासाला सुरुवात होण्याआधी प्रत्येक प्रवाशाची तपासणी देखील होणार आहे. कोरोनाची लक्षण नाही अशाच प्रवाशांना प्रवासाला परवानगी मिळणार आहे. सुरु होणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक लवकरच रेल्वे विभागाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here